सुरक्षित मातृत्वाच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत : डॉ. तोरल शिंदे

पावस : सध्या तरुण तरुणी हे करिअरच्या मागे असल्याने लग्न उशिरा होतात. त्यामुळे मग संततीबाबत प्रश्न निर्माण होतात. त्यांनी त्यातील सुरक्षित मातृत्वाच्या मर्यादा ओळखून मुलांबाबत विचार केला पाहिजे. ज्यांना मुले होऊ शकत नाहीत किंवा नाहीत त्यांना समाजात चांगली वागणूक दिली पाहिजे. आपल्या हातात अनेक गोष्टी नसतात. हे समजून घेता आले पाहिजे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी सांगितले.

गोळप कट्टाच्या ६५ व्या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांची मुलाखत झाली. डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या, ‘चौदा-पंधराव्या वर्षी चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन असलं काही कराव वाटतं होतं. काही स्क्रिप्ट मी लिहिली होती.

आताही ती माझ्याकडे मिळतील. मात्र ते त्या वयातील प्रभावापुरत ठरलं. माझं गणित खूप चांगल होतं. आवड नसतानाही सायन्सला गेले. पुढे मेडिकलला प्रवेश मिळाला. पुढे एमबीबीएस झाले. इंटर्नशिपला जे. जे. ला माझे पती बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे भेटले. त्यांचे मुंबई सोडून रत्नागिरी येथे यायचं ठाम मत होतं. मत बदलेल असं मला वाटलं होतं.

मात्र लग्न झाल्यावर रत्नागिरीमध्ये आलो. मुंबईपेक्षा सुद्धा मला इथे समाधान आहे हे अभिमानाने सांगते. दवाखाना सुरू झाला. मी स्त्री रोग तज्ज्ञ असून सुद्धा मला महिलांना सेवा देताना अनेक त्रुटी आणि मर्यादा आहेत असे वाटतं होते. त्यामध्ये काही करावं असे वाटतं होते. त्यामुळे कोकणातील पहिले कृत्रिम गर्भधारणा केंद्र रत्नागिरीत सुरू केले.

कृत्रिम गर्भधारणा म्हणजे आपले मूल नाही असा मोठा गैरसमज समाजात आहे. ज्यांना काही समस्या आहेत त्या दूर करून कृत्रिमरित्या गर्भधारणा करून गर्भ वाढवला जातो. क्वचितप्रसंगी गंभीर समस्या असल्यास कुटुंबांना विश्वासात घेऊन विविध उपाय केले जातात. याबाबतच्या विविध सेवा आणि उपचार देत असताना रत्नागिरीकर काळाच्या पुढे विचार करतात आणि त्यांना खूप समज आहे हे जाणवलं, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आवड नसताना डॉक्टर झाले
वडील फिल्म डिव्हिजनमध्ये कामाला होते. त्यामुळे लहानपणी चित्रपट क्षेत्रांमध्ये जाण्याची इच्छा होती, परंतु वडिलांच्या दृष्टीने चित्रपट क्षेत्र चांगले नव्हते. त्यामुळे चित्रपट क्षेत्र सोडून दुसरे काही करावे, अशी आग्रही भूमिका होती. त्यामुळे आवड नसताना सायन्सला जावे लागले. बारावीनंतर साईड बदलू असा दिलासा आईने दिला होता, परंतु त्याबद्दल काहीच झालं नाही. पुढे एमबीबीएस झाल्यानंतर जे. जे. मध्ये इंटरशिपच्या वेळेला बालरोगतज्ज्ञ माझे पती डॉ. नीलेश शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर रत्नागिरीला आल्यानंतर कोकणातील पहिले कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्याचे ठरवले आणि त्यात यश मिळत गेले, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 01/Apr/2025