मुंबई-गोवा चौपदरीकरणाबाबत आमदार नीलेश राणे आक्रमक..

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. पावसाळा २ महिन्यांवर असून कामाला गती देण्याबरोबरच अन्य कामेदेखील लवकरच पूर्णत्वास जाण्यासाठी ठेकेदाराला स्पष्ट सूचना द्या. यासंदर्भात आमदार नौलेश राणे यांनी शनिवारी चिपळूण दौऱ्यावर असताना राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपरीकरण व्हावे, यासाठी नीलेश राणे यांनी खासदारकीच्या कालखंडात केंद्र शासनाकडे मागणी केली होती व तसा सातत्यपूर्ण पाठपुरावा देखील केला होता.

तर दुसरीकडे जनतेसह पत्रकारांनीदेखील सातत्याने आवाज उठवला होता. याची दखल घेऊन गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, या महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, बहादूरशेखनाका येथे सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळण्याची घटना घडली.

तसेच परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली. पावसाळ्यात तर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण शहरात ओव्हर ब्रीजचे काम सुरू असताना कामगार जमिनीवर कोसळून जखमी झाले होते.

परशुराम घाटात रस्ता खचण्याची घटना देखील घडली होती. यासारख्या घटना वरचेवर घडत आहेत. तसेच शहरात देखील काही समस्या उद्भवत आहेत. या अनुषंगाने माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आमदार निलेश राणे यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, आमदार निलेश राणे शनिवारी चिपळूणमध्ये आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये चिपळूण शहरातून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजचे जे काम सुरू आहे, ते धीम्या गतीने सुरू आहे.

तरी या संदर्भात ठेकेदाराला समज देऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, तसेच परशुराम घाटामध्ये नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत. या संदर्भात उपाय योजना करण्याबाबत ठेकेदाराला सांगण्यात यावे. याचबरोबर चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे नेहमीच अपघाताच्या घटना भडत आहेत. या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

यावर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला व खुणेकर यांनी डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, शौर्य निमकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 02/Apr/2025