रत्नागिरी : मत्स्य प्रक्रिया कारखान्यांतील दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची ‘मनसे’ची मागणी

रत्नागिरी : औद्योगिक वसाहतीमधील मत्स्य प्रक्रिया कारखान्यांतील दूषित पाणी टँकरद्वारे समुद्रात सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसे झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकून, असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा असे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या सुचनेनंतर मनसेचे शिष्टमंडळ रत्नागिरी औद्योगिक वसाहतीतुन होणाऱ्या प्रदूषणाबाबत माहिती घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अधिकारी उपस्थित नव्हते. मनसे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी उपप्रादेशिक अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे दोन्ही कार्यालये सांभाळावी लागतात. रत्नागिरीत येईन तेव्हा आपल्याला कळवतो. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली.

प्रदूषण विभागाच्या कारभाराचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला. औद्योगिक वसाहतीमधील मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या काही कारखान्यांमधून दूषित पाणी टँकरद्वारे थेट समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्रात व खाडीमध्ये प्रदूषण वाढत आहे. त्याचा मासेमारीवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सांगितले. तसेच विविध मागण्यांचे पत्र त्यांच्याकडे देण्यात आले. तसेच पुढील दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास मनसेमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकून, असा इशाराही देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हा सचिव व कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहराध्यक्ष शुस्मिता सुर्वे, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 02/Apr/2025