संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे असणारा महाराणी येसूबाई यांचा वाडा, जिथे स्वराज्याच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले तो वाडा आता अस्तित्वातच नाही.

त्या ऐतिहासिक वास्तूचे अवशेषही शिल्लक नाहीत. इतकेच नाही, तर या वाड्यात कधीकाळी असलेले जातेदेखील आता एका शेताच्या बांधाला पडलेले आहे. इतिहासाची साक्ष सांगणारे हे अवशेष इतक्या उपेक्षित स्थितीत पाहून इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तूचे संवर्धन करायला कोणीच पुढे आले नाही.
महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी. स्वराज्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाशी लढत असताना त्यांनी स्वराज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यानंतर तब्बल ७०० दिवस औरंगजेबाच्या कैदेत राहूनही त्या डगमगल्या नाहीत. त्या खऱ्या अथनि हिंदवी स्वराज्याच्या महाराणी होत्या. इतकी पराक्रमी आणि सहनशील स्त्री ज्यांच्या वास्तूत कधीकाळी राहत होती त्या वास्तूचा आज पूर्णपणे नाश झालेला आहे. ज्या दगडांवर कधी हा इतिहास घडला तेच दगड आता इतरत्र विखुरले आहेत.
शृंगारपूरमध्ये महाराणी येसूबाईंचा वाडा होता, हे आता फक्त इतिहासात वाचायला मिळते. प्रत्यक्षात मात्र तिथे वाड्याचा एकही अवशेष सापडत नाही. काही लोकं सांगतात की, पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर एक प्रशस्त वाडा होता; पण हळूहळू त्याचे दगड ढासळत गेले. या ठिकाणी शेताच्या बांधावर जुने जाते पडलेले आहे. हे जाते पूर्वी या वाड्यात असावे, असा तर्क आहे. कधीकाळी ज्या घरात स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची राणी राहिली त्या घरातील वस्तूंची अशी उपेक्षा व्हावी, हे पाहून इतिहासप्रेमींची मनं हे लावून जात आहेत.
माहिती फलक हवा
महाराणी येसूबाई यांचे स्मारक बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे; पण त्याचवेळी त्यांच्या मूळ वाड्याच्या अवशेषांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्मारक म्हणजे फक्त एक पुतळा किंवा एक सुंदर इमारत नव्हे, तर त्या व्यक्तीच्या वास्तव्याच्या ठिकाणालाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे, असे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे. जर वाड्याच्या जागेवर एखादा माहितीफलक, एक स्मृतिचिन्ह किंवा एखादा संरक्षित भाग ठेवला गेला असता, तर महाराणी येसूबाईंबद्दल अधिक चांगल्याप्रकारे जागरूकता निर्माण होऊ शकेल आणि येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना योग्य ती माहितीदेखील मिळू शकेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 02/Apr/2025














