चिपळूण : कोकणातून मुंबई, पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतर ब्लॅकलिस्ट झालेल्या बसेस बनावट क्रमांकाचा वापर करून सर्रास प्रवासी वाहतूक करत आहेत. वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी अशी वाहने शोधून त्यांच्यावर कारवाई केली तर अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम बसेल. वाहने धोकादायक असली तरी कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनदिक्कत सुरू आहे, याबाबत चर्चा सुरू आहे.
कोकणातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या राज्यांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासी वाहतूक केली जाते. या वाहतुकीमध्ये खासगी वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची सर्वाधिक पायमल्ली केली जात आहे. अनेक बसचालक विनापरवाना तसेचा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालवतात. अनेक वाहनचालकांकडे तर आरटीओचा विल्लाही नसतो, आगाराच्या परिसरातून अवैधरीत्या टप्पा वाहतूक केली जाते.
एकीकडे एसटीकडून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध सुविधा देऊन प्रवासी आकर्षित केले जात आहेत, पण जुन्या गाड्या, निधी आभावी वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदार त्यांच्यासमोर आव्हान उभे करत आहेत. अनेक खासगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्यामधून अवैधरीत्या मालवाहतूक केली जात आहे. अनेक वाहनचालकांकडे योग्य ते प्रमाणपत्र नसते. रिफ्लेक्टर इंडिकेटर टेललाईटचा वापर होत नाही.
वाहनांच्या एकूण रचनेत बेकायदेशीर फेरबदल केले जातात, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. चालकाच्या केबिनमध्ये प्रवासी बसविले जातात. अनेक खासगी बसचालक राजरोसपणे जड भाडे आकारतात अशा ब्स्कॅल्कांव्र कारवाई केली जाईल असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जाहीर केले जाते; मात्र कारवाई लांब, साधी चौकशीही होत नाही. आपत्कालीन निर्गमन आणि
दरवाजे कार्यरत स्थितीत झालेल्या बसही मुंबई, पुणे मार्गावर धावत आहेत. अनेकांची अनिशमन यंत्रणा कार्यरत नसते.
नुकसान एसटीचे हॉटेल चालकांचे
बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांमुळे तेथील हॉटेल व्यवसाय चालतो; मात्र खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवरील चालकांचे मार्गावरील हॉटेल व्यावसायिकांशी लागेबांधे असतात. त्यांच्या हॉटेलसमोर वाहने उभी करण्यासाठी वाहनचालकांना मोफत जेवण आणि बक्षीस स्वरूपात काही रक्कम दिली जाते. त्यामुळे बसवरील चालक ठरलेल्या हॉटेल्सवर बस थांबवतात, चिपळूण तालुक्यातील सावर्डे, आगवे, आरवलीपासून संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पुलापर्यंत रात्री खासगी वाहन थांबलेली दिसतात. प्रवासी एसटी बसने प्रवास करत नाहीत. त्यामुळे महामंडळाचे नुकसान होतेच, त्याशिवाय प्रवासी बसस्थानकावरही येत नसल्यामुळे तेथील हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे.
महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिकांना प्रवासात प्रवास योजनेचा राज्य परिवहन महामंडळाला फायदा होत आहे. चिपळूण स्थानकातून प्रवासी संख्या वाढवणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला, वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे हे आमचे काम आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना लागेल ते सहकार्य करू. ग्रामीण भागात गरजेनुसार एसटी बसची सेवा दिली जात आहे- दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 02/Apr/2025














