रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करून ग्राहकांचा आनंद द्विगुणीत व्हावा, यासाठी रत्नागिरीतील सर्व ज्वेलर्स दुकाने रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होती. इतर वेळी बहुसंख्य ज्वेलर्स दुकाने रविवारची बंद असतात. गुढीपाडव्याबरोबरच सोमवारी रमजान ईद असल्याने ग्राहकांनी चोख सोने, दागिने खरेदी करणे आणि बुकिंग करण्याची संधी सोडली नाही.
ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळी ग्राहकांचा प्रतिसाद नव्हता. मात्र, दुपारनंतर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अमेय ज्वेलर्सचे मालक अमेय विरकर यांनी सांगितले. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदी तसेच दागिने खरेदी करण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता असते. त्यानुसार रविवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. दागिन्यांसह चोख सोन्याची नाणी आणि वळी खरेदीसाठी ग्राहकांची पसंती होती. त्याचबरोबर लग्न समारंभासाठी लागणार्या दागिन्यांचे बुकिंगही गुढी पाडव्याच्या शुभदिनी समाधानकारक झाले असल्याचेही अमेय वीरकर म्हणाले. त्यामुळे रविवारचा शुभमुहूर्त ग्राहकांनी टाळला नाही हेच दिसून आले. आगामी काळात सोन्याची किंमत आणखी वाढली तर गैरसोय होवू नये, त्याचवेळी सोन्याची गुंतवणूक सुरक्षित असल्याने युवापिढी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आघाडीवर होते. रविवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि सोमवारी रमजान ईद असल्याने बहुसंख्य ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली.
दर वाढले तरी प्रतिसाद…
चोख सोन्याच्या एका तोळ्याची किंमत 90 हजार रुपये असून 1 किलो चांदीची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे. सोने-चांदीचे दर वाढले असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 02-04-2025














