चिपळूण : दिवसेंदिवस तळ गाठणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांमुळे तालुक्यातील धनगरवाड्यांसह दुर्गम भागातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
कडक उन्हाळ्याचे प्रमाण वाढत असतानाच या तहानलेल्या ११ गावांतील वाड्यांनी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे; मात्र अद्याप एकाही गावात टँकर धावलेला नाही. दुर्दैव म्हणजे सध्या प्रशासनाकडे पाणीपुरवठा करण्यासाठी अवघा एकच टँकर आहे. यामुळे ‘कोणी टँकर देता का टँकर’ अशी आर्त हाक टंचाईग्रस्त भागातून दिली जात आहे.
तालुक्यात आजवर पाणीटंचाई मुक्तीसाठी केलेल्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. मुबलक पाऊस असताना तालुका अद्यापही टँकरमुक्त झालेला नाही.
याउलट दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिना उजाडताच पाणीटंचाई उद्भवत असल्याचे आजवरचे चित्र आहे. तालुक्यातील वाड्यावस्तीतील जलस्रोत कडाक्याच्या उष्म्यात रिकामे होऊ लागल्याने प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठीचे अर्ज पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ११ गावांतील वाडीवस्तीमधून अर्ज आले असून, यात प्रामुख्याने सर्वाधिक दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या धनगरवाड्यांना बसत आहे.
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये ५२ गावे आणि २४७वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. टंचाई निवारणासाठी १ कोटी ३४ लाख खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. तालुक्यात उद्भवलेल्या पाणीटंचाई संदर्भातील पाहणी अहवालास अंतिम मंजुरी प्राप्त झाल्यानंतर टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 03/Apr/2025














