दापोली : केळशीत शनिवारी साजरा होणार पहिला कांदळवन उत्सव

दापोली : तालुक्यातील केळशी गावामध्ये शनिवारी (ता. ५) कांदळवन उत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन सामिती, केळशी जलस्वराज्य ग्रामपंचायत, केळशी व मराठमोळी स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने होणार आहे उत्सवाचे औचित्य साधून केळशी गाव पर्यटन ठिकाण म्हणून घोषित करण्यात येणार आहे. कांदळवने उत्सव प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासन कांदळवन कक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख अधिकारी किरण ठाकूर यांनी दिली.

कांदळवन कक्ष विभाग कांदळवने संवर्धन करून त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना उपजीविकेची शाश्वत साधने तयार करण्यास साहाय्य करते. कालवे आणि शिणाण्यांचे दोर, शोभिवंत मासे आणि खेकडेपालन प्रकल्पांबरोबरच गावात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कांदळवन बोटसफारी, कांदळवन कयाकिंग, कांदळवन सहल आणि तारे दर्शन आदी उपक्रम हाती घेतले जातात. या उत्सवात या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात येईल.

या उत्सवानिमित्त ५ एप्रिलला सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळकरी मुलांसाठी केळशी शाळेत प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येईल. कांदळवन प्रदर्शन, कांदळवन लघुपट आणि कांदळवन फेरी आदी कार्यक्रमांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. आखावे आळी येथील महावीर भवनात पोस्टर व लघु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले आहे.

कासवाची पिल्ले समुद्रात झेपावतानाचा अनुभव
दरम्यान, केळशी येथे ५ रोजी ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले अंडकोशातून बाहेर येण्याची शक्यता आहे. यावेळी कासव पिल्लांच्या समुद्रीझेपेचा सर्वांनी सर्व नियम काटेकोरपणे पाळून आनंद घ्यावा, असे आवाहन कांदळवन कक्षाने केले आहे. याच उत्सवादरम्यान सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत केळशी बापू आळी येथील हॉटेल सुरभीमध्ये ‘झाडांच्या मनात जाऊ’ ही महाराष्ट्रभर गाजलेली हरितसर्जक आणि सुरेल मैफल सादर होणार आहे. गिरीश दातार, अपूर्वा कुलकर्णी आणि अबोली देशपांडे या कलाकारांचा समावेश आहे.

वाळूच्या डोंगराची देणार माहिती
दरम्यान, कांदळवन उत्सवाची सहयोगी कंपनी पर्यटन सेवा देते. खाद्यसंस्कृती कार्यशाळेत स्थानिक महिला बचत गटांकडून कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थ बनवायला शिकवले जाणार आहेत. तसेच केळशी गावातील प्राचीन डुंगीची सफर घडवून आणली जाणार आहे. डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाच्या अभ्यासकांनी केळशी गावातील भारजा खाडीला लागून असलेल्या वाळूच्या डोंगराचा अभ्यास केला होता. तिथे सापडलेल्या मृदभांड्यांचे अवशेष, शंखशिंपले, मासे व प्राण्यांची हाडे, त्या ठिकाणी सातव्या शतकापासून मानवी अधिवास होता आदींबाबत माहिती दिली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 03/Apr/2025