चिपळूण : पावसाळ्यामध्ये शहरात सखल भागात तुंबणाऱ्या पाण्याला वाट करून देण्यासाठी शहरातील नाले, पन्ह्यांचे रूंदीकरण तसेच खोली वाढविण्याबरोबर मोठ्या प्रमाणात स्वच्छता हाती घेण्याबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. तसेच जोरदार पावसामध्ये वाशिष्ठी, शिव नदीपात्रात व कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गतवर्षीप्रमाणेच याहीवेळी नदीपात्रातील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जल व्यवस्थापनाचा आराखडा करण्यात आला आहे.

त्यानुसार नागरिकांकडून आलेल्या सूचनांच्या नोंदी घेऊन मान्सूनपूर्व नियोजनाला नगर परिषद प्रशासनाकडून सुरुवात केली जात आहे, अशी माहिती न.प. चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी बुधवारी (दि. २) सांस्कृतीक केंद्रात आयोजित व्यापारी व नागरिकांच्या मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठकीत दिली.
यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढ़ांबकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. खाडे व न.प.तील सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, लियाकत शाह, माजी नगरसेवक आशिष खातू, शशिकांत मोदी, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सुर्वे, तानू आंबेकर, उदय ओतारी, स्वाती भोजने, माजी नगरसेविका सीमा चाळके आदींसह उपस्थित काही नागरिक व व्यापाऱ्यांनी नियोजन संदर्भात मत व्यक्त करीत सूचना केल्या.
यामध्ये प्रामुख्याने बापू काणे यांनी, शहरातील नाले व पऱ्हे नगर परिषदेने ताब्यात घेण्याबाबत कोणते नियोजन केले आहे याची माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले की, संबंधित कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून या बाबत योग्य कार्यवाही करू. मुख्याधिकारी भोसले म्हणाले, शहरातील काही नाले व पऱ्हे खासगी मालकीच्या जागेवर आहेत. त्यांची मोजमापे, रुंदी, खोली या बाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने संबंधित खासगी मालकीच्या जागो न.प. कडे वर्ग करण्यासाठी जागा मालकांना मोबदला द्यावा लागणार आहे. या अडचणी व त्रुटी दूर करून योग्य नियोजन केले जाईल, असे सांगितले. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी शिव नदीतील स्वच्छता आणि गाळ काढण्याबरोबर शहरात टाकाऊ वस्तूंमुळे तुंबलेली गटारे स्वच्छ करणे, नाले- पऱ्हयांची रुंदी वाढविणे, ज्या सखल भागात पावसाचे पाणी तुंबते, प्रामुख्याने अनंत आईस फॅक्टरी परिसर, वाचनालय ते छ. शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसरातील पाण्याचा निचरा होण्याकरिता लवकरच कार्यवाही सुरू केली जाईल. तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर वाशिष्ठी व शिव नदीतील पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येईल.
दरम्यान शहराच्या पूर्व भागातील सह्याद्री खोऱ्यात पडणारा पाऊस कोळकेवाडी धरण व वाशिष्ठी नदीखोरे परिसरात पडणारा पाऊस व हे सर्व पावसाचे पाणी शहराकडे किती प्रमाणात येते या बाबतच्या नोंदी तासातासाने घेतल्या जाणार आहेत, त्याचप्रमाणे पावसाच्या पडणाऱ्या प्रमाणानुसार धरणातील पाणी पातळी सुरक्षित ठेवली जाणार आहे. अशा एकूणच नियोजनाची माहिती देऊन नागरिकांच्या सूचनांच्या नोंदी घेत पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी दिली.
सात ते बारा मजली इमारतींना परवानगी कशी?
सुमारे २०१८ सालात शासनाकडून शहरात लाल व नीळी रेषा रेखांकित करून या क्षेत्रात बांधकाम नियमावलीत काही बंधने व नियमावली केली आहे. तसेच २००५ च्या महापुरानंतर तत्कालीन सभागृहाने शहरातील सखल व पाणथळ जागी बांधकाम करताना भराव टाकून बांधकामाला परवानगी न देण्याचा ठराव केला आहे. मात्र, या बाबतची अंमलबजावणी न झाल्याचा संताप काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला. लाल व निळ्या रेषेची बंधने झुगारून शहरात आज सात ते बारामजली इमारती उभ्या राहात आहेत. तसेच अनेकठिकाणी भरवा टाकला जात आहे. काही बहुमजली इमारतींकडे जाण्यसाठी अरुंद मार्ग आहेत. अशा इमारतींसह भराव टाकून केलेल्या इमारतींना परवानगी कशी मिळाली? असा मुद्दा काहींनी उपस्थित केल्यावर न.प. या संदर्भात कार्यवाही करील, असे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 03/Apr/2025














