रत्नागिरी : मिशन लक्ष्यवेध अंतर्गत राज्यातील १२ विविध क्रीडा प्रकारांच्या खासगी अकादमींचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत खासगी अकादमीना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासनामर्फत प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता धोरण तयार केले जात आहे.
खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
या अंतर्गत आर्थिकसाह्य करण्यासाठी संबंधित अकादमीमधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहायक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था व वर्ग व ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
क वर्ग अकादमींना वार्षिक १० लाख, व वर्ग अकादमीन वार्षिक २० लाख, अ वर्ग अकादमींना वार्षिक ३० लाख रुपये आर्थिक सहाय्य, पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्ज नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे शिंदे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 03/Apr/2025














