रत्नागिरी : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने दि. ७ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉमधून विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. यापुढील ड्रॉ मे व जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.
प्रत्येक उपविभागस्तरावर एकप्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन, तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोनप्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.
१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ही योजना ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे दि. १ एप्रिल २०२३ ते दि. ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन भरणा पर्याय वापरलेला नाही, अशा लघुदाब वीज ग्राहकांसाठी लागू आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला www.mahadiscom.in भेट द्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 03/Apr/2025














