रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये तसेच कृषि विभाग, रत्नागिरी व शास्त्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने दि. २६ मार्च ते ०१ एप्रिल, २०२५ या कालावधीमध्ये सात दिवसीय शास्त्रोक्त मधुमक्षिकापालन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी तर अध्यक्ष डॉ. किरण मालशे, प्रमुख, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये हे होते, तर प्रमुख उपस्थिती विनोद हेगडे, तालुका कृषि अधिकारी, रत्नागिरी यांची होती.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संतोष वानखेडे, किटकशास्त्रज्ञ यांनी सात दिवसाचे वेळापत्रक तयार करून प्रशिक्षणार्थिना दर दिवशी व्याख्यान दिले आणि प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच महाराष्ट्र राज्यातील नामवंत तज्ञ यांना ऑनलाइन पद्धतीने व्याखान व मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. गुहागर येथील मधपाळ श्री. मिलिंद गाडगीळ यांना त्यांचा अनुभव कथन करण्यासाठी पाचारीत केले. डॉ. वानखेडे यांनी उपस्थितांना सातेरी व डंखविरहित मधमाशी वसाहतमधील कामकरी माशी, नर माशी, राणी माशी, राणी घर, परागकण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मध, मेण इत्यादि बद्दल माहीती दिली, तर प्रत्यक्ष दाखविले त्यासोबतच डंखविरहित मधमाशीची वसाहत नैसर्गिक अधिवासातून काढण्याचे तंत्र सांगितले.
त्यासोबतच वसाहतीचे विभाजन कसे करावे, मधपेटीची कशी काळजी घ्यावी. मेणकिडीचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच पावसाळ्यात वसाहतीची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. कोकणात जैवविविधता टिकून राहणेसाठी आणि कोकणातील प्रमुख पिकांचे अधिक उत्पादन वाढविणेसाठी मधमाशीचे संवर्धन व पालन करावे असे आवाहन डॉ. वानखेडे यांनी केले. समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थिणा शिवकुमार सदाफुले, डॉ. किरण मालशे, डॉ. संतोष वानखेडे व श्री. विनोद हेगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
जिल्हयातील एकूण ३२ व्यक्तींनी प्रशिक्षण पूर्ण केले. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यामधून खूप शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये समीरकुमार आडाव पाटील, श्री शिवलकर मोंडकर, श्री आगाशे, श्री भिडे, श्री.गुरव इत्यादी सर्व शेतकरी लांजा, रत्नागिरी, राजापूर गुहागर, संगमेश्वर, दापोली व खेड मधुन उपस्थित होते.
याप्रसंगी समीरकुमार आडाव पाटील, श्री भिडे , श्री राजन शिवलकर इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त करून प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे डॉक्टर वानखेडे व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, व कृषि विभाग, रत्नागिरी यांचे कर्मचारी व अधिकारी यांचे सहकार्य मिळाले. सांगता कार्यक्रमाचे आभार विनोद हेगडे, तालुका कृषि अधिकारी, रत्नागिरी यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 03/Apr/2025
