गुहागर किनाऱ्यावरील पर्यटनाला पोलिसांचे सुरक्षा कवच

गुहागर : कोकणातील केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या किनाऱ्यावर इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गुहागर किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांचे सुरक्षाकवच मिळणार आहे.

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदर विभागाच्यावतीने दोन सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांबरोबर गुहागर पोलिसांचेही समुद्रकिनारी फेरफटका मारून सुरक्षेविषयी सर्वाधिक लक्ष आहे. शहराला सुमारे सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर अधिक सक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा देण्याचे कामही सुरक्षारक्षक व पोलिस यंत्रणा करत आहे.

मात्र, गुहागर पोलिस ठाण्याकरिता आलेल्या सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलिंगमुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शहराच्या समुद्रकिनारी गस्ती करता दोन इलेक्ट्रिक सायकल गुहागर पोलिस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. या सायकल पूर्ण समुद्राच्या वाळू‌मधून सहज फिरू शकतात. यामुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावरील गस्त गुहागर येथील समुद्रकिनारी गस्त घालताना पोलिस, अधिक व्यापक बनले आहे. कोणतीही अघटीत घटना घडल्यास तातडीने सहा किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्यावर पोलिस सहज पोहोचू शकतात.

गस्तीबाबत नियमित नोंद
गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी सायकल गस्त सुरू केली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत कायम गस्त केली जाते. दररोज सुरू असलेल्या या गस्तीबाबत रत्नागिरी कार्यालयात नोंद होते. पर्यटकांची सुरक्षा हा विषय अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 04/Apr/2025