संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीपट्ट्यात रात्रीच्या वेळी गेले चार-पाच दिवस दोन ते तीन वाळू व्यवसायिक मध्यरात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने ड्रेझरने वाळू उपसा करत असून रातोरात सदरची वाळू डंपरच्या माध्यमातून जागेवरून हलवली जात आहे. महसूल विभागाला याची कुणकुण लागतात बुधवारी मध्यरात्री या छुप्या वाळू चोरीवर कारवाई करण्यात आल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.
शासनाचे नुकसान करून छुप्या पद्धतीने आणि ड्रेझरचा वापर करून संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीत बेसुमार वाळू उपसा सुरू होता. महसूल मंत्र्यांनी ज्या भागात वाळूची चोरी होताना आढळेल तेथील तहसीलदारांना निलंबित केले जाईल, अशी घोषणा विधानसभेत करताच ठीक-ठिकाणच्या वाळू चोरीला आळा बसला. याचाच अर्थ या वाळू चोरीला महसूल विभागाचा छुपा पाठिंबा होता असा अर्थ निघतो.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीपट्यात गत महिन्यात पाच ते सहा वाळूमाफियांकडून बेसुमार वाळू उपसा केला जात होता. मात्र थेट तहसीलदारांवरच कारवाईची घोषणा होताच हे चोरटे व्यवसाय बंद करण्यात आले. महसूलचे अधिकारी स्वतःवर कारवाईची वेळ येतात वाळू चोरीचे प्रकार एका दिवसात थांबू शकतात, हेच यातून सिद्ध झाले. मात्र एका रात्रीत लाखो रुपये कमवण्याची सवय झालेले वाळूमाफिया गेले आठवडाभर करजुवे खाडी भागात छुप्या पद्धतीने मध्यरात्री डेझरच्या सहाय्याने वाळू काढत असल्याची चर्चा या परिसरात पसरली होती. बुधवारी मध्यरात्री अधिकाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने या छुप्या आणि चोरट्या वाळू व्यावसायिकांवर कारवाई केल्याचे आज दिवसभर करजुवे भागात सांगितले जात होते. येत्या चार दिवसात एका मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने करजुवे खाडी भागात पुन्हा एकदा चोरट्या वाळूचे व्यवसाय सुरू होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 04/Apr/2025














