संगमेश्वर : आंबव कोंडकदमराव येथील प्रणय जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव कोंडकदमराव या छोट्याशा गावातील प्रणय शरद जाधव याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्रणयने शेतात काबाडकष्ट करत आणि घरीच अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकजण एमपीएससी परीक्षा म्हणजे लाखोंचा खर्च करून खासगी शिकवणी वर्गात जाणे असे मानतात.

मात्र, प्रणयने हे मत खोटे ठरवले आहे. देवरूख-रत्नागिरी मार्गावर असलेल्या आंबव कोंडकदमराव येथे प्रणयचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले, त्यानंतर त्याने आश्रमशाळा निवे येथे शिक्षण घेतले. खरवते दहिवली येथील कृषी महाविद्यालयातून त्याने बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्यासोबत असलेले बाहेरगावचे मित्र एमपीएससी परीक्षेची तयारी करत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत प्रणयनेही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि तयारी सुरू केली. प्रणयचे वडील ग्रामपंचायतीतून निवृत्त झाले असून, आई अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत आहे. आपल्या मुलाने मोठे अधिकारी व्हावे, अशी त्यांच्या आईवडिलांची तीव्र इच्छा होती.

प्रणयने २०१८ पासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्याने शेतीत आईवडिलांना मदत करत अभ्यास चालू ठेवला. या दरम्यान त्याने मुंबई आणि रत्नागिरी येथे चार वेळा परीक्षा दिली. अखेर, कोणत्याही महागड्या शिकवणी वर्गात न जाता, त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली. आपल्या अथक परिश्रमाने प्रणयने आईवडिलांचे स्वप्न साकार केले आहे. या संपूर्ण प्रवासात रत्नागिरीतील राहुल शशिकांत आठल्ये यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रणयच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर ग्रामीण भागात राहूनही यश मिळवता येते. त्याने तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. लवकरच त्याचे नाशिक येथे एक वर्षाचे पशिक्षण सुरू होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 04/Apr/2025