चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव टाकून नाला बुजविला आहे. त्यामुळे गटाराचे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहे. पावसाळ्यात गटाराचे पाणी इमारतीच्या अंगणात येते. शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामावर आणि महामार्गाचे काम करताना झालेल्या अतिक्रमणावर प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई करावी, त्यांचे आम्ही स्वागतच करू, असे डॉ. सरफराज गोठे यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापनसंदर्भात चिपळूण येथे झालेल्या बैठकित महामार्गावरील पाण्याच्या प्रश्नावरून प्रांताधिकारी आणि नागरिक यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली होती. या बैठकित उपस्थित प्रश्नांवर मांडलेली मते याबाबत डॉ. गोठे माहिती दिली.
ते म्हणाले, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे शहरातून काम सुरू आहे. तेव्हा महामार्गालगत असलेल्या नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव टाकण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्यामुळे सांडपाणी माघारी परतते ते आमच्या बिल्डींगच्या परिसरात येते. या सांडपाण्यातून आम्हाला ये-जा करावी लागते. २०१९ पासून ही समस्या भेडसावत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना याबाबत सूचना केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आम्हाला केवळ आश्वासनेच मिळाली. हिच वस्तुस्थिती मी पालिकेने बोलविलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मांडली होती. आता आश्वासन नको कृती होऊदे असे मला म्हणायचे होते. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी माझे बोलणे समजून घेण्याची गरज होती. त्यांनी तसं घेतलं नाही. आमची इमारत अनधिकृत नाही, नैसर्गिक नाल्यात जे अतिक्रमण झाले आहे ते अनधिकृतपणे आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी आमच्या इमारतीसह शहरातील सर्वच इमारतींची पाहणी केली पाहिजे. जिथे जिथे अनधिकृत बांधकामे आहेत, नैसर्गिक नाले बुजवून अतिक्रमण केली आहेत त्यावर कारवाई करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:39 PM 04/Apr/2025
