चिपळूण : विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे होणार स्थलांतर

चिपळूण : पशुधनाच्या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी १९७७ पासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील ६ जिल्ह्यांसाठी चिपळूण येथे कार्यान्वित करण्यात आलेली विभागीय रोग अन्वेषण कार्यशाळेचे आरे कॉलनीत स्थलांतर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीवर बुधवारी शासन निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असल्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असून, आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला लगतच्या कोल्हापूरच्या प्रयोगशाळेशी जोडण्यात आले आहे.

पशुधनाच्या आजाराचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार व्हावेत, पशुधनामध्ये येणाऱ्या साथीच्या रोगांची लक्षणे विचारात घेऊन या रोगाचे रोगनिदान करून रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात ८ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी पुणे विभागात पुणे व कोल्हापूर अशा दोन प्रयोगशाळा कार्यान्वित असून उर्वरित सहा प्रयोगशाळा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर व चिपळूण येथे कार्यरत आहेत. कृषी व सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार १० ऑक्टोबर १९७४ ला चिपळूण शहरातील मार्कडी येथे कोकण विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा मंजूर केली. ही प्रयोगशाळा १ एप्रिल १९७० पासून कार्यान्वित झाली.

येथील प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्तासह पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, वाहक, परिचर अशी एकूण ११ पदे मंजूर आहेत. मात्र, अलीकडच्या काळात ही सर्व पदे रिक्त आहेत. दोन वर्षांपासून परिचरही भरला गेलेला नाही.

त्यामुळे सद्यःस्थितीत ही प्रयोगशाळा फक्त नावापुरती राहिली होती. जिल्हा पशुसंवर्धन सर्व चिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे येथील सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सद्यःस्थितीत ही प्रयोगशाळा येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीत कार्यान्वित असून, या प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग या कोकणातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

२०२३ पासून या प्रयोगशाळेच्या स्थलांतरावर चर्चा सुरू झाली. त्यानुसार पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील पशुधनाची संख्या व गुण नियंत्रण प्रयोगशाळेचे गोरेगाव, मुंबई येथे उपलब्ध इमारत ही बाब विचारात घेवून चिपळूणच्या प्रयोगशाळेचे मंजूर पदांसह स्थलांतरण उपायुक्त पशुसंवर्धन, गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगांव (पूर्व), मुंबई या संस्थेच्या इमारतीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 05/Apr/2025