संगमेश्वर : मालमत्तेच्या वादातून भावाला मारहाण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दळवीवाडी येथे मालमत्तेच्या वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना ०४ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराच्या परिसरात घडली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश श्रीपत दळवी (वय ६६ वर्षे, रा. निवेखुर्द दळवी वाडी) आणि आरोपी हरिश्चंद्र श्रीपत दळवी (वय ७२ वर्षे, मूळ रा.निवे खुर्द दळवीवाडी, सध्या रा. देवरुख) हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित सामाईक जागा आहे.

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी हरिश्चंद्र दळवी हे त्यांच्या वडिलोपार्जित सामाईक जागेत जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करत होते. सकाळी ९ वाजेपासून ते हे काम करत असताना, फिर्यादी प्रकाश दळवी यांनी त्यांना विचारले की, “तुम्ही आमच्या सामाईक वडिलोपार्जित जागेतील आंबे लागलेले आंब्याचे झाड का तोडले?” यावर आरोपी हरिश्चंद्र यांनी फिर्यादी यांना “मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस?” असे म्हणून त्यांच्या हातातील चिव्याच्या बांबूच्या काठीने फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर, दंडावर आणि डाव्या हाताच्या करंगळीवर मारले. तसेच, त्याच काठीने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या पायाच्या मांडीवर मारून दुखापत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 07-04-2025