रत्नागिरी : राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत झालेल्या ऐतिहासिक बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा ठोसपणे पाठपुरावा करण्यात आला. सर्व विद्यमान कंत्राटी कर्मचारी यांना मंजूर पदांवर कायमस्वरूपी समाविष्ट करावे व उर्वरित रिक्त पदे स्पर्धा परीक्षेमार्फत भरण्यात यावीत, भरती प्रक्रियेत सर्वप्रथम कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना प्राधान्य द्यावे, सुमारे ३ ते १७ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी क्योमर्यादा सवलती द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आल्या. मंत्र्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील विविध माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ आणि सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये शेकडो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. ते गेली ३ से १७ वर्षे अन्यायकारक परिस्थितीत सेवा बजावत आहेत. अल्प वेतन कोणतीही नोकरीविषयक सुरक्षितता नाही, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुविधांचा अभाव अशा समस्यांना या कर्मचाऱ्यांना तोड द्यावे लागत आहे.
मंडळाचे काम शाश्वत व कायमस्वरूपी असूनही ठेकेदारी व्यवस्थेच्या आडोशाला हे कंत्राटी कर्मचारी असुरक्षिततेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यांच्यामागे भारतीय मजदूर संघ ठाम उभा राहिला असून, १७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा ठोसपणे पाठपुरावा केला, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे यांच्यातर्फे शुभम वाडकर आणि निखिल नवेले यांनी ही माहिती दिली.
नियमितीकरणाची मागणी
या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे आणि त्यांना योग्य न्याय मिळण्याची प्रत्यक्ष कृती होईपर्यंत या कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ही लढाई एकट्या भारतीय मजदूर संघाची नाही, तर ती प्रत्येक स्वायत्त मंडळातील ठेकेदारी व्यवस्थेतील कर्मचाऱ्याची आहे. यावर शासनाने त्वरित कार्यवाही करून या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे, अशी सर्व स्तरांतून मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 07/Apr/2025














