कळझोंडी बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी नजीकच असलेल्या संदीप लक्ष्मण पवार यांच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला असताना गुरांची अचानक धावपळ उडाली. अगदी नजीकच तीन फुटांवर बिबट्या बसलेला पाहून शेतकरी संदीप पवार यांची पाचावर धारण बसली. त्यांनी मोठ्या हुशारीने आपली पाळीव जनावरे त्वरित हाकलल्याने त्यांच्या जीवावरील संकट टळले. यामुळे या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच वाघाने या परिसरात आपली वर्दळ सुरू केली असून भक्ष्य शोधण्यासाठी गुरांच्या मागावर असलेले या वाघाची बिबट्याची हालचाल दिसून येत आहे.

याबाबतचे वृत्त असे की शेतकरी संदीप पवार हे आपली पाळीव जनावरे चरवून सायंकाळी ५ वाजता घरी घेऊन येत होते याचवेळी वाटेत हा वाघ दबा धरून शिकारी भक्ष्य शोधण्यासाठी ऐटीत बसला होता. प्रत्यक्ष बिबट्याला बसलेला पाहून संदीप पवार हे क्षणार्धात भांबावून गेले, त्यांना प्रचंड घाम सुटला व प्रचंड भयभीत झाले. तरीही त्यांनी आपली पाळीव जनावरे झटापटीने सुरक्षितपणे मार्गाने घरापर्यंत आणली. हा बिबट्या बौद्धवाडीच्या अगदी नजीक आलेला पाहून येथील इतर शेतकरी सुभाष पवार, सुशांत पवार, संगम पवार, किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तो वाघ तेथून दुसऱ्या भागाकडे जात असल्याचे पाहिले. त्यामुळे या भागात प्रचंड खबराटीचे वातावरण पसरले असून या भागातील शेतकरी रात्रभर झोपले नाहीत. आपल्या वाड्या-वस्तीवर लक्ष ठेवून पहारा करीत होते. याबाबत वन विभाग यांना कल्पना देण्यात आली असून वन विभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कळझोंडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते महादेव आग्रे, किशोर पवार, सुभाष पवार, संगम पवार यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 18-09-2024