सावर्डे, दि. 0८ एप्रिल 2025: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दहीवली ब्रद्रुक निम्मेवाडी येथे सोमवार, दि. 07 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17:30 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी अजय महादेव कदम (वय 55, सध्या रा. दहीवली ब्रद्रुक निम्मेवाडी, मूळ रा. करजुवे, ता. संगमेश्वर) यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अजय कदम यांच्या घराशेजारी आंबा आणि काजूची बाग असून, खबर देणाऱ्या व्यक्तीने त्या दिवशी बागेत गेल्यावर घरातून कुजलेला वास येत असल्याचे जाणवले. संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील आणि सावर्डे पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता, अजय कदम हे मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात दि. 07 एप्रिल 2025 रोजी रात्री 22:45 वाजता आमृ. क्रमांक 13/2025 अंतर्गत करण्यात आली. भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.एस.) 194 अंतर्गत संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-04-2025














