रत्नागिरीत सव्वातीन लाखांचा गांजा जप्त, सांगलीतील एकजण अटकेत

रत्नागिरी, ८ एप्रिल २०२५: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. मन्सुर अली निजाम पठाण (वय ४०, रा. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत अंदाजे ३ लाख २५ हजार ५०० रुपये इतकी आहे.

पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. या सूचनांचे पालन करत उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने रोजच्या गस्तीवर भर देत संशयितांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.

कशी झाली कारवाई?

दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर आणि त्यांचे सहकारी कोकणनगर ते प्रशांतनगर परिसरात गस्त घालत असताना साई-भूमी नगर बिल्डिंगच्या मागील बाजूस एक संशयास्पद व्यक्ती दिसली. पथकाने तात्काळ त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने आपले नाव मन्सुर अली निजाम पठाण असे सांगितले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळील लाल रंगाच्या बॅगेत ५ ब्राउन प्लास्टिक पाऊचमध्ये उग्र वासाचा गांजा आढळून आला.

गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात

या कारवाईनंतर पथकाने ५ किलो ५५.५ ग्रॅम गांजा जप्त करून आरोपी मन्सुर पठाण याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्रमांक १३४/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या नेतृत्वात झाली. यात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सपोफौ दिपक साळवी, पोहेकॉ अरुण चाळके, पोहेकॉ अमोल भोसले, पोहेकॉ आशिष भालेकर, पोहेकॉ पंकज पडेलकर, पोहेकॉ भालचंद्र मयेकर, पोकॉ अमित पालवे आणि पोकॉ कौस्तुभ जाधव यांचा सहभाग होता.

रत्नागिरीत अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 08-04-2025