रत्नागिरीत शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन टाकण्यास दिरंगाई; 54 लाखांच्या कामासाठी पालिकेचा दीड कोटीचा खर्च

रत्नागिरी, दि. 08 एप्रिल 2025: रत्नागिरी शहरातील शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारे 54 लाख रुपये किमतीची 650 मीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून झालेल्या दिरंगाईमुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या कामाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी सहा फ्लोटिंग पंपांचा वापर सुरू करण्यात आला असून, त्यांच्या वीजबिलापोटी पालिकेला महिन्याला 10 ते 12 लाख रुपये मोजावे लागत आहेत. वर्षभराचा हिशेब केल्यास 54 लाखांच्या कामासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत, ज्यामुळे पालिकेच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

रखडलेल्या प्रकल्पाचा तपशील
शीळ जॅकवेल कोसळल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून सहा फ्लोटिंग पंप बसवण्यात आले. मात्र, शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत नैसर्गिक उतारासाठी आवश्यक असलेली 650 मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. गेल्या पावसाळ्यापूर्वी हे काम अर्धवट झाले होते, पण मुसळधार पावसात टाकलेले पाईप वाहून गेल्याने पालिकेचे 54 लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर दुसऱ्या पावसाळ्यातही हे काम हाती घेतले गेले नाही.

फ्लोटिंग पंपांमुळे वाढलेला खर्च
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रात 250 अश्वशक्तीचे तीन पंप कार्यरत आहेत, तर नदीवर सहा फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत. या नऊ विद्युत पंपांचे मासिक वीजबिल सुमारे 29 लाख रुपये आहे, त्यापैकी 10 ते 12 लाख रुपये हे फ्लोटिंग पंपांचे आहे. परिणामी, 54 लाखांच्या पाईपलाईन कामाकडे दुर्लक्ष झाल्याने पालिकेला वर्षभरात दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे.

पालिकेची उपरती आणि नवीन योजना
पालिकेच्या पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून हे सत्य उघड झाले आहे. आता पालिकेला जाग आली असून, येत्या तीन-चार दिवसांत पाईपलाईन टाकण्याचे काम पुन्हा हाती घेतले जाणार आहे. पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले की, ठेकेदाराने 600 मीटर पाईपलाईन टाकण्यास नकार दिल्याने पालिका स्वतः हे काम करणार आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिकांची मागणी
“चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला” अशी पालिकेची अवस्था झाली असून, भविष्यातील हा वायफळ खर्च टाळण्यासाठी शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची पाईपलाईन तातडीने टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रखडलेल्या या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा योजनेतील नियोजनातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 08-04-2025