◼️ काल सायंकाळी झालेले शॉर्ट सर्किट वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला
रत्नागिरी, दि. 08 एप्रिल 2025 – मे महिना जवळ येत असताना रत्नागिरी शहरात सूर्य आग ओकत आहे. सध्या तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून, काही वेळा ते 38 ते 40 अंशांपर्यंत पोहोचत आहे. या तापलेल्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी बाजारपेठेत फिरणाऱ्या ग्राहकांसाठी दुकानदारांनी आपल्या दुकानांबाहेर ग्रीन नेटचे छत लावले आहे. विशेषत: रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतील राम आळी आणि गोखले नाका या भागात अशा पद्धतीने छत लावलेले मोठ्या प्रमाणात दिसते. मात्र, या चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या छतांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका वाढला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे वीजपुरवठा खंडित
हि छते घट्ट ताणून न बांधल्याने वाऱ्यामुळे ते वर उचलले जाऊन विद्युत तारांना स्पर्श करत आहेत. परिणामी, शॉर्ट सर्किटच्या घटना घडत आहेत. काल सायंकाळी गोखले नाका परिसरात अशीच एक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेनंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले असले तरी आजही विजेचा लपंडाव सुरूच आहे. मुख्य बाजारपेठेतील विद्युत वाहिनी दुरुस्त करताना कॉंग्रेस भवन ते गवळी वाडा या भागातील वीजपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका केवळ व्यापाऱ्यांनाच नाही, तर संपूर्ण परिसरातील रहिवाशांनाही बसत आहे.
आगीची भीती आणि प्रशासनाची सूचना
या छतांमुळे शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही अशा घटनांमुळे बाजारपेठेत धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत महावितरणने व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने हि छते तातडीने काढून टाकण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता
उन्हापासून संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या या छतांचा हेतू चांगला असला तरी त्यामुळे निर्माण होणारा धोका चिंताजनक आहे. व्यापाऱ्यांच्या या चुकीमुळे संपूर्ण बाजारपेठ आणि आसपासच्या रहिवासी भागावर परिणाम होत आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 08-04-2025














