मुंबई-गोवा महामार्गाच्या भूसंपादनाचे १०० कोटी प्रलंबित

रत्नागिरी : गेली तेरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आणखी एक दुखणे पुढे आले आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या २५९ किमीच्या मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या भूसंपादनाचे अजूनही १०० कोटी रुपये येणे बाकी आहे. अॅवॉर्ड होऊनही शासनाकडून निधी न आल्यामुळे जमीनमालक (खातेदार) गेली ६ वर्षे महसूल विभागात खेपा घालत आहेत. यामध्ये गुहागर-चिपळूण-कराड या मार्गाचाही समावेश आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे दुष्टचक्र कायम आहे. राज्यातील अनेक महामार्ग झाले; परंतु हा महामार्ग अजूनही अपूर्णच आहे. अनेक सरकारे बदलली; परंतु चौपदरीकरण काही पूर्ण झालेले नाही. सहा टप्प्यातील या मार्गाचे काम करणारे अनेक ठेकेदार बदलले. नवीन कंपन्या आल्या; परंतु मार्ग अपूर्णच आहे. आता युद्धपातळीवर काम सुरू असले तरी पूर्ण व्हायला अजून किती वर्षे जातील, हे सांगता येत नाही. त्यात या महामार्गातील आणखी एक दुखणे पुढे आले आहे. जिल्ह्यातील परशुराम ते झाराप असा २५९ किमीचा हा महामार्ग ६ टप्प्यामध्ये होत आहे. यामध्ये परशुराम ते आरवली ३९ लाख, आरवली ते काटे १७ कोटी, काटे ते वाकेड २२ कोटी, वाकेड ते तळकट १ कोटी ६ लाख, तळकट ते झाराप ८ कोटी ५४ लाख असे टप्पे आहेत. त्यात गुहागर-चिपळूण-कराड या मार्गात १३ गावे असून त्यासाठी ४६ कोटी मंजूर आहेत.

या कामासाठी भूसंपादन झाले आहे. त्याचे अॅवॉर्डदेखील झाले आहेत; परंतु अजून मोबदला मिळालेला नाही. सुमारे १०० कोटी रुपये मोबदला अजून शासनाकडून येणे बाकी आहे. खातेदार या मोबदल्याच्या प्रतिक्षेत असून, गेली पाच ते सहा वर्षे झाली ते महसूल विभागात खेपा मारत आहेत.

भूसंपादनाचे प्रस्ताव पाठवले जात आहेत; परंतु त्यासाठी लागणारा निधी अपेक्षेप्रमाणे येताना दिसत नाही. भूसंपादनामध्ये जमीन, घरे, झाडे, गोठे, खोके आदींचा समावेश आहे. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी, संगमेश्वर, पाली, वांद्री, तळेकांटे, नावडी, आरवली, तुरळ, धामणी, म्हाबळे या भागातील ३०० खोके होते. त्यांना भरपाई देण्याचे मान्य झाले आहे. त्यापैकी आरवली, तुरळ, म्हाबळे येथील खोकेधारकांना भरपाई मिळाली आहेत. उर्वरित खोकेधारक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 09/Apr/2025