रत्नागिरी, ०८ एप्रिल २०२५: रत्नागिरीतील बीएसएनएलच्या नेटवर्क आणि सेवेच्या खराब दर्जावरून संतापलेले लांजा-राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून, जर सुधारणा न झाल्यास बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात ०७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी झालेल्या बैठकीत घडली.
आमदार किरण सामंत यांच्याकडे राजापूर, लांजा, साखरपा, रत्नागिरी आदी तालुक्यांमधील नागरिकांकडून बीएसएनएलच्या नेटवर्कच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती घेऊन बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीत अधिकाऱ्यांनी अपूर्ण माहिती सादर केल्याने आमदारांनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “बैठकीला चहा-पाण्यासाठी नाही, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बोलावले आहे. तुमचा हा गलथान कारभार चालणार नाही,” असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
आमदार किरण सामंत यांनी गावामध्ये बीएसएनएलची रेंज नसल्याने लोकांना होणाऱ्या अडचणींवरही बोट ठेवले. “गावामध्ये रेंज नसल्याने लोकांना काय कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे अतिशय बेजबाबदारपणाचे वागणे आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, बीएसएनएल ही केंद्र शासनाची एजन्सी असूनही स्थानिक पातळीवर तक्रारींची दखल न घेणे आणि जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना किंमत न देण्यावरही त्यांनी टीका केली.
आमदार किरण सामंत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा बैठक घेण्याचे आदेश दिले. “लांजा-राजापूर विधानसभेचा मी आमदार आहे. जर तक्रारींची दखल घेतली नाही, जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत, तर गाठ माझ्याशी आहे. सुधारणा झाली नाही तर बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकू,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 09-04-2025














