लांजा : ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेरवलीवासीयांना अखेर पाणी

लांजा : तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे वेरवली बुद्रुक गावातील सर्वच वाड्यांना पाणी मिळू लागले आहे. ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता.

तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी धरणावर कोट्यवधी रुपये खर्च करून जवळजवळ ४० वर्षे लोटली तरी वेरवली धरण प्रकल्पातून वेरवली गावाला पाणी मिळालेले नव्हते. पाण्यासाठी उजवा आणि डावा कालवाही काढण्यात आला होता. बेर्डेवाडी धरणाच्या माध्यमातून वेरवली बुद्रुक परिसरातील १०८१ जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. या धरणाचे १९८३ मध्ये भूमिपूजन होऊन वेरवली धरणाच्या कामाला सुरुवात झाली. तब्बल ४० वर्ष झाली तरीही येथील ग्रामस्थांना पाणी मिळालेले नाही. धरण जवळ असताना येथील ग्रामस्थांना विकत पाणी घेणे भाग पडत होते.

धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती उद्भवली होती. धरणजवळ असताना येथील ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याने आमदार किरण सामंत यांनी येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन या संदर्भातील माहिती दिली. तसेच, निवेदनाद्वारे प्रशासकीय कारभाराबाबत तक्रारही केली. त्यानंतर आमदार सामंत यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. आमदार सामंत याच्या प्रयत्नांमुळे डाव्या बाजूच्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वेरवली बुद्रुक गावातील सर्वच वाड्यांपर्यंत पाणी पोहोचले असून, वेरवली बुद्रुक गावातील विहिरींना पाणी वाढले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 09/Apr/2025