चिपळूण : वाशिष्ठीतील गाळउपशाचा मेरिटाईम बोर्डाकडे प्रस्ताव

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ अधिक वेगाने काढला जावा, यासाठी आ. शेखर निकम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गोवळकोट येथील वाशिष्ठी मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. या संदर्भात बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे चर्चा करू व गाळ काढण्यासाठी ‘नाम’चे सहकार्य घेण्यात येईल. तसेच यंत्रणांसाठी अधिक निधी मागवला जाईल, असे आ. शेखर निकम यांनी बैठकीत सांगितले.

यावर्षी नलावडे बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. आणि गाळ काढण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली. या कामाचा आढावा घेण्यासाठी आ. निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथे बैठक झाली. या बैठकीला प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, जलसंपदा विभागाचे श्री. सलगर, श्री. खोत, मुख्याधिकारी विशाल भोसले, चिपळूण बचाव समितीचे सदस्य बापू काणे, शहानवाज शाह, महेंद्र कासेकर, किशोर रेडीज, उदय ओतारी उपस्थित होते.

यावेळी उकताड, बाजार पूल, पेटमाप, शिवनदी या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे काम अधिक मशिनरी लावून पूर्ण करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी आकाश लिगाडे आणि आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाला दिल्या. ज्या ठिकाणी सामान्य पोकलेन वापरता येत नाही त्या ठिकाणी लॉन्ग बुम पोकलेन ची आवश्यकता असल्याने या मशिनरीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला, अशी माहिती यांत्रिकी विभागाने दिली. लॉन्ग बुक मशिनरीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन आ. शेखर निकम यांनी दिले.

गोवळकोट येथील वाशिष्ठी मुखाजवळ गाळाचा डोंगर साचला आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्याचे ठरले, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे सदर प्रस्ताव पाठवला जाणार आहे. वाशिष्टी गाळमुक्त करण्यासाठी सध्या यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेसोबत नाम फाउंडेशनची यंत्रणा वाढल्यास कमी वेळेत जास्त गाळ काढला जाऊ शकतो, अशी सूचना चिपळूण बचाव समितीतर्फे करण्यात आल्यानंतर आ. शेखर निकम यांनी नाम फाउंडेशन कडे तत्काळ संपर्क साधला. आवश्यक पोकलेन आणि डंपर वाशिष्ठी आणि शिवनदी मध्ये गाळमुक्तीसाठी पाठवावे, अशी विनंती आ. शेखर यांनी नाम फाऊंडेशनकडे केली.

Radhakrushna patapedhi

गाळ नेण्याचे आवाहन
सध्या वाशिष्ठीमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू असून पूर रेषेबाहेर भरावासाठी गाळ हवा असल्यास नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 10/Apr/2025