रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात विविध प्रकारच्या फाईल्स अस्ताव्यस्त टाकून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दालनाची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हारिस शेकासन यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांना १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेने अंमलबजावणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेची स्वच्छता तसेच रंगरंगोटी अशा विविध कामांना सुरुवात झालेली आहे; मात्र हे काम करत असताना जिल्हा परिषदेची अभिलेख तसेच अन्य अडगळीत, मोडकेतोडके सामान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्याच दालनात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महत्त्वाचे घटनात्मक पद आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतलेल्या नाहीत.
त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणूक झालेली नाही. तिथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जिल्हा परिषदेवर कुणाचा अंकुशच राहिलेला नाही, अशी नाराजी शेकासन यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे हे उत्तम उदाहरण असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनाचे महत्त्वच प्रशासन विसरले आहे का, असा प्रश्नही केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 10/Apr/2025













