राजापुरात सुतारकाम करणाऱ्या व्यावसायिकावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

राजापुर, रत्नागिरी : राजापुर तालुक्यातील तळगाव सुतारवाडी येथील रहिवासी दीपक मनोहर पांचाळ (वय ५३, शिक्षण १० नापास, व्यवसाय सुतारकाम) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली असून, त्यानंतर फिर्यादी यांनी १० एप्रिल २०२५ रोजी पहाटे २:३६ वाजता तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५९/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१), ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दीपक पांचाळ हे माळ नाका येथील अजय लाड यांच्या दुकानातून घरगुती वस्तू घेवून घरी परतत होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ प्रताप संजय सावंत (रा. तळगाव पाटीलवाडी, राजापुर) यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर त्यांनी फोनद्वारे आरोपी क्रमांक २ संजय सावंत (रा. तळगाव पाटीलवाडी, राजापुर) यांना बोलावून घेतले. फिर्यादी यांनी ४ वर्षांपूर्वी प्रताप यांच्या आत्येच्या घराला स्लायडिंग बसविण्याचे काम केले होते, त्यावेळी उरलेल्या काचांचे पैसे परत न दिल्याच्या रागातून हे दोन्ही आरोपींनी फिर्यादींवर हल्ला चढवला.

आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत हाताने धक्काबुक्की केली. तसेच, आरोपी क्रमांक १ प्रताप सावंत याने बाजूला असलेल्या जंगली लाकडाच्या काठीने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर मारले. याचवेळी आरोपी क्रमांक २ संजय सावंत यांनी फिर्यादी यांच्या कानाखाली आणि पोटावर ठोसे मारले. शिवाय, “तू तुझ्या हिशोबात राहा, जास्त काही केलास तर कुठे नेऊन टाकीन, कळणार नाही,” अशी जीवघेणी धमकी देखील दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 11-04-2025