रत्नागिरी : मजगाव येथे नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला

रत्नागिरी, दि. ११ एप्रिल २०२५: रत्नागिरी तालुक्यातील केळे मजगाव येथील शितपवाडी परिसरात काल, दि. १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख शुभांगी सुरेश मांडवकर (वय ५० वर्षे, रा. केळे ठिकवाडी, ता. जि. रत्नागिरी) अशी झाली आहे. तिचे पूर्वाश्रमीचे नाव कलावंती गजानन कर्टे असे होते.

स्थानिक पोलीस पाटील यांना सकाळी फिरण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांनी शितपवाडी येथील गोडबोले कोड परिसरात नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासणीनंतर त्यांना मृतदेह हा शुभांगी मांडवकर यांचा असल्याचे समजले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शुभांगी मांडवकर यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद आमृ. क्रमांक ३८/२०२५ बी.एन.एस.एस १९४ अंतर्गत करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 11/Apr/2025