चिपळूण : शंकरवाडी येथील रस्ता डांबरीकरणाचे काम नागरिकांनी पाडले बंद

चिपळूण : शहरातील शंकरवाडी येथे पालिकेच्या वतीने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात कमी प्रमाणात डांबर वापरले जात असल्याचा आक्षेप परिसरातील नागरिकांनी घेतला. भाजपच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी धडक देत कामाचा पंचनामा केला. नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काम बंद करण्यास भाग पाडले. यानंतर पालिकेचे अभियंता आणि नागरिकांची बैठक झाली.

शहरात विविध ठिकाणी कोट्यवधी खर्चाची रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. मे महिन्यापूर्वीच प्रस्तावित असलेली ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. शहरातील शंकरवाडी येथे गुरुवारी रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. मात्र, डांबर टाकण्यापूर्वी रस्त्याची स्वच्छता करून तेथे पुरेसे डांबर टाकले जात नसल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली. डांबराचा किरकोळ फवारा मारून डांबरीकरण सुरू असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. या घटनेची भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी पालिकेतील बांधकाम अभियंत्यांशी संपर्क साधून रस्ता डांबरीकरण निकृष्ट असल्याची माहिती दिली. त्यानुसार सहायक अभियंत्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. या अभियंत्यांनाही सदरचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची बैठक घेत डांबरीकरण कामाची सविस्तर माहिती दिली. रस्ता डांबरीकरण नव्याने करून देण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आले.

यावेळी भाजपचे मधुकर निमकर, प्रदीप शीतप, श्रीराम शिंदे, महेश कांबळी, संदीप भिसे, शशिकांत मोदी, प्रणय वाडकर, अविनाश सावर्डेकर, परब, पटवर्धन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 11/Apr/2025