रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात सात ते आठ नॉटीकलमैल अंतराच्या आत येवून परप्रांतीय मच्छीमार नौका मासेमारी करत आहेत. स्थानिक मच्छीमारांना लक्ष्य करणाऱ्या ड्रोनसह सीमाशुल्क विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि त्यांच्या अंमलबजावणी विंगचे लक्ष कुठे आहे? घुसखोरी करणाऱ्या या परप्रांतीय नौकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य वेस्टकोस्ट पर्ससीन मच्छीमार संघटनेचे कार्याध्यक्ष नासीर वाघू यांनी दिला आहे. संपूर्ण कोकण पट्टीवर ही खुलेआम घुसखोरी होवून सर्व मासा पकडून नेला जात असल्याचेही कार्याध्यक्षांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील ३ हजार १७४ मच्छिमार नौका असून त्यातील २ हजार ५१५ यांत्रिकी नौका आहेत. या मासेमारीवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. अशा या जिल्ह्याच्या समुद्रात कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळच्या अद्यावत नौका घुसखोरी करून सात ते आठ नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करत आहेत.
आधीच स्थानिक असलेल्या पारंपरिक, मच्छिमार पर्ससीन, गिलनेट नौकाना व छोट्या होड्यांना मासा मिळत नाही.
रोजच्या रोज खर्च अंगावर पडत असताना परप्रांतीय नौका रोजच्या रोज राज्याच्या जलधीक्षेत्रात घुसखोरी करत आहेत. या परप्रांतीय नौकाना घुसखोरी करून मासेमारी करण्याचा परवानाच दिला आहे काय? असा सवालही कार्याध्यक्ष वाघू यांनी उपस्थित केला.
स्थानिक मच्छिमारांवर कारवाई करताना कोणताही सहानुभूती दाखवली जात नाही. त्याचवेळी परप्रांतीय नौकांवर मात्र कारवाई करताना आखडता हात घेतला जात आहे.
ड्रोन, मत्स्य व्यवसाय विभाग, कस्टम विभाग या घुसखोरीला का रोखू शकत नाही? स्थानिक मच्छिमारांवर मासळी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता परप्रांतीय नौकांवर कारवाई होण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
स्थानिकांवर निर्बंध आणि परप्रांतीयांना आपुलकी हा स्थानिक मच्छीमारांवर अन्याय आहे. त्यामुळे या घुसखोरीवर कारवाई झाली नाही तर स्थानिक मच्छीमार आंदोलन करतील. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केली जात असल्याचे कार्याध्यक्ष वाघू यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 12/Apr/2025














