….तर रत्नागिरी भाजपचा बालेकिल्ला बनेल : ना. नितेश राणे

रत्नागिरी : प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून संघटनेला जिल्ह्यात एक नंबर बनवायचे आहे अशी जिद्द ठेवली तर रत्नागिरी हा भाजपाचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुमच्यासोबत मी कायम आहे, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीतील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग अ‍ॅण्ड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेने खासदार श्री 2025 आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री 2025 या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ना. राणे रत्नागिरीत आले होते. स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर लक्ष्मीचौक मैदान, गाडीतळ रत्नागिरी येथे शनिवारी ही स्पर्धा पार पडली.

यावेळी ना. राणे म्हणाले, खा. राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही भव्य अशी ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेले आहे. गेले चार दिवस जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम या निमित्ताने झाले असून यामुळे चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ आणि प्रामुख्याने हिंदू समाजासोबत उभ राहण्यासाठी इथे आलो आहे. पक्ष म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार राणे साहेब या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मोठं काम उभं करायचं आहे आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रमावर आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणार्‍या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील. यासाठी एकमेकांच्या? ? खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचे काम इथे उभं करायचे असून ती जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी मला दिली आहे. या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री बनवण्याच्या मागेही हाच उद्देश आपल्या नेत्यांचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्याला रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळाले पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, जिल्हा नियोजन पासून ते विशेष कार्यकारी पदापर्यंत प्रत्येक पदांमध्ये भाजपचे स्थान इथे आता दिसणार आहे. इथे आपण संख्येने कमी आहोत ही भावना आता कार्यकर्त्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपा, शहर भाजपा आणि बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने ना. राणे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज नलावडे, मुन्ना चावंडे, सचिन करमरकर, राजन फाळके, राजू तोडणकर, दादा दळी, संदीप नाचणकर, सुशांत पाटकर, अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर, अ‍ॅड. भाऊ शेट्ये, विक्रम जैन, दादा ढेकणे, अमित विलणकर, ऋषी केळकर, उमेश कुलकर्णी, अशोक वाडेकर, उमेश देसाई, मंदार खंडकर, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, राधा हेळेकर, सायली बेर्डे, निलेश आखाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 14-04-2025