रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या एकूण अडीच हजार प्राथमिक शाळा तसेच ३५० माध्यमिक शाळांमधील एकूण १ लाख विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा निकाल १ मे रोजी लागणार आहे. २५ एप्रिलपर्यंत या परीक्षा असून फक्त ५ दिवसांत निकालाचे काम शाळा व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी २०२४-२५ मध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी (पेंट) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार ८ एप्रिलपासून या परीक्षा सुरू झाल्या असून, २५ एप्रिलपर्यंत त्या घेतल्या जाणार आहेत. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावर घेतल्या जात होत्या. यावर्षी मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला.
परीक्षा लवकर होत असल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच परीक्षा पुर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असली तरी विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असते. त्याचबरोबर प्रत्येक शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग व्हावा यासाठी २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणविभागाने घेतला.
जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरु झाली आहे. २५ एप्रिलपर्यंत परीक्षा चालणार आहे. यामध्ये मात्र शाळा व्यवस्थापनाला निकाल लावताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. १ मे ला निकाल जाहीर करायचा असून २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वानुसार ५ दिवसाच्या आत निकाल जाहीर करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 14/Apr/2025














