रत्नागिरी : निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाचा त्रास

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रत्नागिरीतील रेल्वेस्थानक, गयाळवाडी परिसरातील प्रवासी निवारा शेड गायब झाले आहेत. रेल्वेतून आलेल्या चाकरमान्यांसह सर्वच प्रवाशांना या परिसरात उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे, अशी खंत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी व्यक्त केली आहे. तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

महामार्गावर रत्नागिरी रेल्वेस्थानक ते गयाळवाडी बसथांब्यापर्यंत पूर्वी प्रवासी निवारा शेड होत्या. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे त्या शेड काढून टाकण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

मुंबई किंवा अन्य ठिकाणांहून रत्नागिरीकडे येणारे प्रवासी महामार्गावरील रेल्वेस्थानक बस थांब्यावर उभे असतात. त्यांना रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागासह गुहागर, लांजा परिसरात जायचे असते. त्यामुळे हे सगळे चाकरमानी रेल्वेस्थानकावर उभे राहतात. त्या ठिकाणी उभे राहण्यासाठी निवारा शेडची व्यवस्था नाही. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून आरोग्य मंत्रालयाने नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.

महामार्ग चौपदरी करण्याचे काम वेगाने सुरू असल्यामुळे मोठ-मोठे ट्रक, मालवाहू गाड्या धुरळा उडवत जात असतात. या सगळ्याचा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतची खबरदारी संबंधित महामार्गाचे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण त्याचप्रमाणे वाहतूक महामार्ग पोलिसांनी घ्यावयाची आहे.

पर्यटकांना धुळीचा त्रास
रत्नागिरी रेल्वेस्थानक सुसज्ज झालेले असून, तिथे प्रवाशांसाठी सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत. मात्र याच रेल्वेस्थानकापासून २०० मीटर अंतरावरील बसथांब्याच्या सुविधेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे. याठिकाणी स्थानिकांसह पर्यटकही धुळीमध्ये ताटकळत उन्हात उभे राहत आहेत, असे हारिस शेखासन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 15/Apr/2025