चिपळूण : रामपूर ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला. ग्रामीण रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आरोग्य खात्याने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव जाधव यांच्या यांच्या प्रयत्नामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के यांनी १५ हजार रुग्णांची तपासणी केली. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गुढे, मिरवणे, बामणोली, चिवेली, मार्गताम्हाणे, उभळे अशी सहा उपकेंद्र आहेत. गुढे, बामणोली, चिवेली, उभळे उपकेंद्रांच्या इमारती आहेत. मात्र मिरवणे, मार्गताम्हाणे उपकेंद्राना इमारत नाही. ही इमारत लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली जात आहे. गुढे, बामणोली, उभळे, चिवेली उपकेंद्रांना २५ हजार रुपये कायाकल्प प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले आहे. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला रत्नागिरी जिल्ह्याचा कायाकल्प दोन लाखांचा २०२३- २०२४ या वर्षांसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचे दर्जा मिळाला असला तरी सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हे रुग्णालय अजूनही ग्रामीण रुग्णालय आपल्यासारखे वाटत नाही. शासनाने येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल- कैलास पटेकर, रामपूर चिपळूण

रुग्णांना जीवदान
या रुग्णालयात २४६ विंचूदंश झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले. या वर्षात एकूण १६ सर्पदंश झाले तर १०९ श्वानदंश झाले. दंश लस उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना जीवदान मिळाले. आतापर्यंत येथे ७३ कुटुंबनियोजन तर सात सुखरूप प्रसूती झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 15/Apr/2025