लांजा : तालुक्यातील वेरवली खुर्द पडवण ग्रामस्थांना गेल्या ३८ वर्षांपासून वेरवली बेर्डेवाडी धरणातील पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. गावाकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले असूनही धरणातून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत वेरवली खुर्द पडवण ग्रामपंचायतीच्यावतीने पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
वेरवली बेर्डेवाडी धरणातून वेरवली बुद्रुक गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली आहे; मात्र वेरवली खुर्द-पडवण ही गावे बेर्डेवाडी धरणातील पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. पाणीवाटपाबाबत दुजाभाव का ? असा संतप्त सवाल पडवण गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. वेरवलीखुर्द, पडवण गावातील ग्रामस्थांना बेर्डेवाडी धरण प्रकल्पातून पिण्यासाठी व शेतीसाठी व अन्य कामांसाठी पाणीपुरवठा व्हावा यासाठी बेर्डेवाडी धरणातून वेरवली खुर्द पडवण या दोन गावांमध्ये कालव्याची पाईपलाईनदेखील गेली आहे. या कालव्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे.
असे प्रशासनाकडून ग्रामस्थांना सांगण्यात येते. पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी वेरवरी खुर्द-पडवण ग्रामस्थांना अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता ग्रामस्थांना पुरेशी आणि स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वेरवली खुर्द-पडवण ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेता येथील सर्व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे. आता या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करून त्यांची गैरसोय कायमची दूर करावी, अशी मागणी वेरवली खुर्द-पडवण ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 15/Apr/2025














