चाफेरीत कुलूपबंद विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी; भारतीय बौद्ध महासभा शाखेतर्फे निषेध

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती सर्व जगभर साजरी झाली; मात्र रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी बौद्धवाडीतील कुलूपबंद विहारात जयंती साजरी करावी लागली, याबाबत भारतीय बौद्ध महासभा शाखा चाफेरीतर्फे एका पत्रकान्वये खंत व्यक्त केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा चाफेरी शाखेपाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी बुद्धपूजेसाठी ग्रामस्थ उपस्थित झाले. बुद्धमूर्ती आणि डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा कुलूपबंद विहारात आढळून आल्या. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेतर्फे भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांना कुलूपबंद विहारात मानवंदना देऊन पूजा घेतली. कुलूप लावण्याविरुद्ध भारतीय बौद्ध महासभेतर्फे निषेध केला आहे.

हजारो वर्षांपासून पददलितांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी उठाव करून नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करून पददलितांना न्यायहक्क मिळवून दिला; मात्र डॉ. आंबेडकरांच्याच अनुयायांनी त्यांच्याच अनुयायांना विहाराला कुलूप लावण्याचा घाट घातल्याने येथील आंबेडकर अनुयायी संतप्त झाले आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

चाफेरी गावात दोन धार्मिक शाखा असून, त्यांच्यामध्ये विहाराचा वाद सुरू आहे. यासंबंधी पोलिस ठाणे जयगड येथील पोलिस निरीक्षकांनी यावर दोन्ही शाखांनी सामंजस्याने आपापले कार्यक्रम राबवावेत, असा योग्य निर्णय दिला होता तसेच धर्मादाय आयुक्तांकडे संस्था नोंदणीसाठी केस प्रलंबित आहे; मात्र जयंतीच्या दिवशी अचानक विहाराला कुलूप लागल्याने वाडीतील जनतेने तीव्र खंत व्यक्त करत आंबेडकर अनुयायांच्या या वर्तणुकीचा निषेध व्यक्त केला. याचवेळी गावातील मराठवाडी-साणवाडी येथील व्यक्तीही बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी विहारांमध्ये जमले होते; मात्र कुलूपबंद विहार पाहून इतर समाजातील मान्यवरांनीही याबाबत खेद व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 16/Apr/2025