देवळे, चाफवली येथे गवारेड्यांकडून आंबाबागांचे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबाबागांचे गवारेड्यांकडून अतोनात नुकसान केले जात असून, यावर वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.

देवळे-चाफवली गावातील आंब्याच्या बागातून गवारेड्यांचे कळपच्या कळप येत असून, हतातोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे भयानक नुकसान करत असून, यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

हे गवारेडयांचे कळप आंबाबागातून घुसतात आणि जिथपर्यंत मान पोहोचते तिथपर्यंतचा आंबा ओढून खातात किंवा फांद्यांना पासून फांदी हलवतात व मोडतातही. त्याने आंबा खाली पडला की, तो खातात.

यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होत असून, यावर पर्यायच मिळत नसल्याने व ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. काजू बागायतीमध्येही गवारेडे असेच पार मोठे नुकसान करत असून, छोटी-मोठी काजूची झाडे शिंगात अडकवून उपटून टाकतात, त्यामुळे या भागात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.

देवळे गावातील सलीम खतीब, नाझीम खतीब, चाफवली येथील लक्ष्मण चाळके, प्रकाश चाळके यांच्या आंबाबागांचे गवारेड्यांनी फार मोठे नुकसान केले आहे. हे गवे फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही बागांतून फिरू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा, या विवंचनेत या भागातील शेतकरी सापडले आहेत.

तक्रार करणे वेळखाऊ
याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यास त्याला लागणारी कागदपत्रे गोळा करण्यातच फार वेळ लागतो. कृषी विभाग, तलाठी कार्यालय, घोषणापत्र, सातबारा, आठ अ, भूमिअभिलेखचा नकाशा अशा अनेक गोष्टीचा पाठपुरावा करताना व सह्या घेताना, पंचयाद्या घालताना शेतकरी हैराण होतो. त्यामुळे तक्रारही करायला शेतकरी पुढे येत नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 16/Apr/2025