दापोलीत हापूस खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी

दापोली : सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दापोलीत दाखल झालेल्या पर्यटकांनी हापूस आंब्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने स्थानिक लोकांना यावर्षी हापूसचा स्वाद घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दापोलीच्या विविध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर पर्यटक कोकणच्या या राजाला खरेदी करण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. यावर्षी बदलत्या हवामानामुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आंब्याची आवक कमी असल्याने त्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत.

सध्या दापोलीतील आंबा उत्पादक स्वतः किंवा त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत दापोली कोकण कृषी विद्यापीठाजवळील विजय मैदानापासून हर्णेकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्टॉल लावून हापूसची विक्री करत आहेत. या ठिकाणी दोन डझनच्या बॉक्सपासून ते पाच डझनच्या पेट्यांपर्यंत आंबा उपलब्ध आहे आणि आंब्याच्या गुणवत्तानुसार त्याचे दर ठरवले जात आहेत. सध्या बाजारात हापूस आंबा दीड हजार रुपये प्रति बॉक्स ते तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति पेटी दराने विकला जात आहे.

येथील हापूस आंब्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांना खात्री असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. साताऱ्याहून आलेल्या अखिलेश जाधव या पर्यटकाने सांगितले की, “हापूस आंबा केवळ कोकणातच मिळतो आणि वर्षातून एकदा तरी तो खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे आम्ही आवर्जून आंबा खरेदी करत आहोत. दर थोडे जास्त असले तरी इथे येणारा प्रत्येक पर्यटक हापूस खरेदी करताना दिसत आहे.”

Rotery school

परंतु, वाढलेल्या दरांमुळे दापोलीतील सामान्य नागरिकांना मात्र अजून आंब्याची चव घेता आलेली नाही. येथील जाणकारांच्या मते, १५ मे पर्यंत बाजारात आंब्याची आवक वाढल्यानंतर दरांमध्ये काहीशी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे सध्या दापोलीतील आंबा बाजारपेठ केवळ पर्यटकांच्या खरेदीमुळे गजबजलेली दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 22-04-2025