इस्स्रो अनुभवातून साकारले ‘वेध ब्रह्मांडाचा’; मंडणगड शिक्षण विभागाची स्मरणिका

मंडणगड : इस्रो दौऱ्यातील अनुभवांचे कथन लिखित स्वरूपात साकारलेले वेध ब्रह्मांडाचा या विज्ञान अंक पुस्तकाचे प्रकाशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. तालुक्यातील बौद्धिक, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने वेध ब्रह्मांडाचा या तालुक्यातील शिक्षकांनी इस्रो, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी अभ्यास दौऱ्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन करणाऱ्या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी, त्यातून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे विविध चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची इस्रो सेंटरची मोहीम हाती घेतली. यानंतर विद्यार्थी निर्माण करणाऱ्या शिक्षकांनीही इस्रो या संस्थेस भेट द्यावी, हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समिती मंडणगड यांनी हाती घेतला. या मोहिमेत तालुक्यातील २० शिक्षकांनी सहभागी होऊन ही मोहीम पूर्ण केली. यावर न थांबता या मोहिमेचे एक पुस्तक तयार केले. सहभागी २० शिक्षकांनी विविध विषयांवर लिखाण केले असून, या पुस्तकास वेध ब्रह्मांडाचा असे नाव देण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेत हे पुस्तक पोहचवले जाणार आहे. या पुस्तकाच्या वाचनाने विद्याध्यर्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होईल व भविष्यातील मंडणगड तालुक्यातूनही देशसेवा करणारे वैज्ञानिक तयार होतील, अशी अपेक्षा आहे.

या वेळी तालुक्यातील १४ केंद्रांतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे, लेखक जगदीश ओहोळे, नगरसेवक आदेश मर्चेंडे, विजय पोटफोडे, विस्तारी अधिकारी बापट, मुळ्ये, जगताप आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 16/Apr/2025