संगमेश्वर : दख्खन धनगरवाडीतील प्रौढाचा जंगलात आढळला मृतदेह

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी येथील लक्ष्मण विठोबा कोलापटे (४८) यांचा मृतदेह १५ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कळंब येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ते १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कोलापटे हे जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आज सकाळी परिसरातील नागरिकांना जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तो मृतदेह लक्ष्मण कोलापटे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता.

लक्ष्मण कोलापटे यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. देवरुख पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 16/Apr/2025