पूर येथे डंपर-ओमनीचा भीषण अपघात; दोघे गंभीर

देवरुख : देवरुख-रत्नागिरी मार्गावर देवरुखनजीकच्या पूर येथील धोकादायक वळणावर आज मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. डंपरने एका मारुती ओम्नी कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे डंपर रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात ओम्नीमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देवरुख ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

डंपर आणि ओम्नीच्या या भीषण धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु वळणावर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. देवरुख पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे देवरुख-रत्नागिरी मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 16-04-2025