रत्नागिरी : सरकार विविध सवलती दिल्याचे भासवत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती याहून वेगळी आहे. वीज बिले दुप्पट आली आहेत. घरगुती गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे, एसटीची भाडेवाढ झाली आहे. अशा सर्वच बाजूंनी जनता अक्षरशः भरडली जात आहे.
मार्च महिन्यांची ग्राहकांना आलेली वीज बिले सरासरी बिलाच्या दुप्पट रकमेची आल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. पाच ते सातशे रुपयांचे सरासरी बिल येणाऱ्या ग्राहकाला या महिन्यात बाराशे ते चौदाशे रुपयांची बिले आली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज कंपनीने ग्राहकांना जोराचा झटका दिला आहे. एप्रिल २०२४ चा बीज वापर ६५ युनिट, साधारण तेवढाच वीज वापर एप्रिल
२०२५ मध्ये झाला असेल, तरीही बीज वापर ११८ युनिट दाखवला गेला आहे. तेवढेच बल्ब, फॅन घरात असताना वीज वापर दुप्पट दाखवला गेल्याने ग्राहक चक्रावले आहेत.
ग्राहक वीज बिले दुप्पट कशी, अशी विचारणा करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तेंव्हा त्यांना तुमचा वौज वापर वाढला आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. घरात इलेक्ट्रीक साधने वाढली नसताना बिल दुप्पट कसे, याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत एकदम ५० रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. ८०५ रूपयांची गॅसची टाकी ८५५ रूपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा १९ किलो टाकीचा दर १७३६ रुपये आहे. एसटीची भाडेवाडही मध्यंतरी करण्यात आली आहे. शेतीच्या उत्पत्न्नाचा खर्च वाढत नाही. साखरेला दर असून शेतकऱ्यांना दिला जात नाही. पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय परवडत नाही, अशा सर्वच बाजूंनी शेतकरी, मध्यमवर्गीय मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे.
विविध आकार वीज ग्राहकांच्या माथी…
ग्राहकांना वीज बिले देताना आकारण्यात येणारे विविध आकार आजपर्यंत ग्राहकांना समजलेले नाहीत. स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार असे वेगवेगळे आकार प्रत्येक महिन्याला वीज ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. एवढे करूनही खंडित वीज पुरवठ्याचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. कधी सिंगल फेज बीज तर कधी दुरूस्तीच्या नावाखाली पाच, सहा तास वीज गायब असते. याचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे.
शासनाने महिलांना एस.टी. चा प्रवास ५० टक्के सुट दिली आहे खरी. परंतु याचा परिणाम शेवटी कुठून ना कुठून शासनावर होत आहे. शेवटी एस.टी.ला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे- रुपेश बारगुडे, लांजा
शासनाने लाडकी बहीण योजना काढून महिलांना खूश केले आहे. परंतु या १५०० रु. च्या बदल्यात महागाई वाढवल्याने दुप्पट पैसे आमच्या खिशातून जात आहेत. यामुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण होवून बसले आहे- तुकाराम बाणे, रत्नागिरी
सध्या महागाईमुळे गरिबांनी जगायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूची किंमत वाढतच निघाली आहे. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे-प्रज्ञा सुर्वे, देवरूख
सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. एकवेळचा तांदूळ खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा हाती नाही आहे. महागाई इतकी वाढली आहे की, सर्वसामान्यांनी जगावं तरी कसं. – शुभांगी सावंत, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 17/Apr/2025














