चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी ग्रामपंचायतीने करवसुलीवर विशेष भर दिला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ३१ मार्चअखेरची संपूर्ण थकबाकी एप्रिलअखेरीस जमा करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. थकीत कराचा भरणा न केल्यास ग्रामपंचायत नोटीस बोर्ड तसेच स्थानिक वृत्तपत्रांतून थकीत करदत्यांची नावे प्रसिद्ध करण्याचा इशारा खेडर्डी ग्रामपंचायतीने दिला आहे.
सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून खेर्डी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीची घरपट्टी कराची रक्कम दीड कोटी, तर पाणीपट्टीची मागणी सुमारे सहा लाखांच्या घरात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गावातील करदात्यांची संख्याही वाढतच आहे. करवसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने प्रयत्न केले जातात; मात्र तरीही काही नागरिक त्या त्या वेळी कराची रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा करत नाहीत. कराची अपेक्षित वसुली होत नसल्याने विविध सेवासुविधा देताना त्याचा ग्रामपंचायतीवर आर्थिक ताण पडतो आहे. त्यामुळे शंभर टक्के करवसुलीवर ग्रामपंचायतीने भर दिला. मार्चअखेर झाला असला तरी एप्रिल महिन्यात संबंधित थकबाकीदारांच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
थकीत करदात्यांना थकीत रकमा भरण्याची सूचना केली आहे. तरीही अनेकांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे जे करदाते ३० एप्रिलपर्यंत कराची थकीत रक्कम जमा करणार नाही, अशा थकबाकीदारांची नावे स्थानिक वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची कारवाई टाळण्यासाठी संबंधित थकीत करदात्यांनी एप्रिल महिना अखेरपर्यंत त्वरित थकीत रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन खेर्डी ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 17/Apr/2025












