रत्नागिरीसह चिपळूण, खेडमधील ३५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरीसह चिपळूण आणि खेड या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. या तीन तालुक्यांतील एकूण १४ गावांतील ३५ वाड्यांतील १० हजार ९३८ ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांना शासकीय एक व खासगी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिह्यात वाढत्या उष्म्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दिवसागणिक पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. या टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन स्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. यावर्षी रत्नागिरी तालुक्यानंतर आता चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांतही पाणीटंचाईने ग्रासले आहे.

तेथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. रत्नागिरीतील ५ गावांतील २५ वाड्यांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चिपळूण तालुक्यात ७ गावांतील ८ वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी एक टँकर धावत आहे. खेडमध्ये २ गावांतील दोन वाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रशासन स्तरावरून सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. परिणामी, पाणीटंचाई उग्ररूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील १० हजार ९३८ ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी शासकीय १ व खासगी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी धावत आहेत.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे
रत्नागिरी – शिरगाव, नाचणे, सडामिऱ्या, सोमेश्वर, खेडशी. चिपळूण- टेरव, अडरे, कोंडमळा, सावर्डा, कुटप, अनारी, कादवड. खेड – घेरारसाळगड आणि खवटी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 17/Apr/2025