खेड बसस्थानकात मद्यधुंद दोन एसटी चालकांचा धिंगाणा; 3 महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई

खेड : येथील बसस्थानकात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून धिंगाणा घालत एकमेकांना बेदम मारहाण करणाऱ्या आर. डी. आरदवाड आणि एस. व्ही. भाबड या दोन एसटी चालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. दोघांनाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी बुधवारी दिली. गेल्या केवळ दीड महिन्याच्या कालावधीत चालकांवर निलंबनाची कारवाई होण्याची ही तिसरी घटना असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमधील बेशिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी रात्री उशिरा, मद्यप्राशन केलेल्या आरदवाड आणि भाबड या दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. दोन्ही चालकांनी एकमेकांना शिवीगाळ करत अक्षरशः धूमस्टाईलने मारहाण केली. हा सर्व प्रकार बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दोन्ही चालकांवर निलंबनाचा बडगा उगारला.

विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. सुमारे २० दिवसांपूर्वी, मद्यपान करून बस चालवताना सवणजवळ अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मंगेश आहाके यांच्यावर तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याआधी, गेल्या महिन्यातही आणखी एका चालकाला गैरवर्तणुकीमुळे निलंबित करण्यात आले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने आता बेशिस्त कर्मचाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 17/Apr/2025