मंडणगड : मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र कुंबळे व ग्रामीण रुग्णालय भिंगळोली यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया मोहिमेच्या निर्धारित कामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्यात अग्रेसर स्थान मिळवले आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात डॉ. एस. एस. गरूड (सर्जन) यांनी १४९ बिनटाका शस्त्रक्रिया केल्या. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्तम नियोजन केले.
मंडणगड तालुक्याचे काम ८२ टक्के इतके झाले असून हे सर्वाधिक काम आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची सुरवात नुकतीच झाली असून एप्रिल या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्येच प्राथमिक आरोग्य कुंबळे येथे डॉ. गरूड यांनी २३ बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. विशेष म्हणजे २३ स्त्री शस्त्रक्रियेबरोबरच १ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियादेखील चालू महिन्यात तालुक्यात झाली आहे. स्त्रियांबरोबरच पुरुषांनीदेखील नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुढे यावे, स्त्रियांचे शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया एकदम सोपी आहे ती झटपट होते.
शस्त्रक्रियेनंतर कोणताही त्रास होत नाही, अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर तासाभरात घरी जाता येते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया शासकीय संस्थेत सुरक्षितपणे केली जाते. बदलत्या काळात कुटुंबकल्याण कार्यक्रमाचे अंर्तगत स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शासकीय संस्थेत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. त्यामुळे पात्र लाभार्थीनी कुटंबकल्याण नसबंदी शस्त्रक्रिया शासकीय संस्थेतच करून घ्याव्यात, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी या निमित्ताने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 18/Apr/2025
