चिपळूण : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे त्यातून समाजाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. म्हणूनच साहित्यिकांनी समाजाच्या व्यथा वेदनांना साहित्यातून वाचा फोडली पाहिजे. ही जबाबदारी आंबेडकरी परिवर्तनवादी पुरोगामी साहित्यिक विचारवंतांवर अधिक आहे, असे प्रतिपादन संजय गमरे यांनी येथे केले.
येथील अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि डॉ. बाबासाहेव आंबेडकर जागृती मंडळ, आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय अपरान्त साहित्य कला संमेलन रविवारी (ता. १३) डॉ. बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे येथे घेण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन आंबडवे गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुदामबाबा सकपाळ यांच्या हस्ते झाले. या वेळी आंबडवेचे मुंबई अध्यक्ष महेंद्र सकपाळ, ग्रामीण अध्यक्ष सुदर्शन सकपाळ उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात पुस्तकावर बोलू काही हा परिसंवाद झाला. त्यामध्ये पत्रकार संदेश पवार यांच्या पुरोगामी महाराष्ट्र उजव्या वळणावर या पुस्तकावर सुनील जाधव, चित्रकार लेखक चंद्रकांत घाडगे यांच्या बेधडक या पुस्तकावर भा. ला. टुले, कवी किशोर कासारे यांच्या पोसोन
या पुस्तकावर धम्मचारी सत्यसिद्धी, नथुराम जाधव यांच्या महामाता रमाई या पुस्तकावर किशोर कासारे यांनी सुंदर मांडणी केली. तिसऱ्या सत्रात अपरांत कवी संमेलन कवी किशोर कासारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. चौथ्या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’या पुस्तकाचा परिचय संदेश पवार यांनी करून दिला.
संमेलनात झालेले ठराव
पूर्ण बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला हे जिल्हास्तरीय साहित्य कलासंमेलन पाठिंबा देत असून, महाविहाराचे व्यवस्थापन संपूर्णतः बौद्ध धर्मीय बांधवांच्या हाती देण्यात यावे. नागपूर येथील दीक्षाभूमीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये, तिच्या व्यवस्थापनामध्येदेखील अन्य धर्मीयांचा शिरगाव होऊ देऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले आंबडवे येथे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शोभेल असे भव्यदिव्य स्मारक उभारावे. भगवान बुद्धांच्या काळातील धम्म लिपीचा (आता ब्राह्मी लिपी म्हणतात) प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक गावाचा विहाराचा, वाडीच्या नावाचा फलक धम्मलिपीमध्ये लिहून त्याचे अनावरण करण्यात यावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 18/Apr/2025














